वाई जिमखान्याच्या ३२ व्या शिबिराची रंगतदार सांगता
वाई शहरातील नामांकित क्रीडा संस्था वाई जिमखाना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३२ व्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध क्रीडा प्रकारांच्या आकर्षक प्रात्यक्षिकांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सी.ए. डी. बी. खरात तसेच उद्योजक धर्मराज भोसले उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक करत, खेळामुळे बालकांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित होतात असे प्रतिपादन केले.
या समारंभाला वाई जिमखान्याचे अध्यक्ष तथा उत्कर्ष पतसंस्थेचे संचालक अमर कोल्हापुरे, उपाध्यक्ष सुनील शिंदे, संचालिका प्रीती कोल्हापूरे, संचालक विजयराव रसाळ, प्रशांत मांढरे, शैलेंद्र गोखले आणि अमीर बागुल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच उत्कर्ष पतसंस्थेच्या चेअरमन अनुराधा कोल्हापुरे, उपाध्यक्ष अॅड. रमेश यादव, संचालक संजय वाईकर, श्रीमती मंगला अहिवळे, श्रीमती नीला कुलकर्णी आणि श्रीमती अलका घाडगे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या बालकांनी योगा, मल्लखांब, रोप मल्लखांब आणि एरियल सिल्क यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांचे थरारक आणि आकर्षक सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कौशल्याने आणि आत्मविश्वासपूर्ण प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची अक्षरशः डोळ्यांचे पारण फेडले.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, अशा प्रकारच्या क्रीडा शिबिरांमुळे बालकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक सक्षमता, संघभावना आणि शिस्त विकसित होते. निरोगी आणि सक्षम पिढी घडविण्यासाठी अशा उपक्रमांची समाजात मोठी आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक, स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.